*जुनी पेन्शनचा प्रश्न सोडवा, अन्यथा पुन्हा आझाद मैदानावर येऊ* - *माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचा सरकारला इशारा

*जुनी पेन्शनचा प्रश्न सोडवा, अन्यथा पुन्हा आझाद मैदानावर येऊ* -  *माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचा सरकारला इशारा

पंढरपूर/प्रतिनिधी 
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने सोलापुरात भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला जिल्ह्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब सहभागी झाले होते.
जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न तत्काळ सोडवा अन्यथा पुन्हा आम्ही हजाराच्या संख्येने मुंबई येथील आझाद मैदानावर येऊ असा इशारा माजी शिक्षक आमदार सावंत यांनी सरकारला दिला आहे..

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मूक मोर्चामध्ये शिक्षकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन शासनाचे लक्ष वेधले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवा सुरू केलेल्या अनेक शिक्षकांना सुरुवातीला अंशतः अनुदानित अथवा विनाअनुदानित तत्त्वावर सेवा बजावावी लागली. त्यानंतर शासनाच्या अनुदान धोरणानुसार त्यांना अनुदान प्राप्त झाले; मात्र पेन्शनच्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

“सेवा १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची, मग पेन्शनची तारीख वेगळी का ?” असा सवाल उपस्थित करत शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा बजावूनही निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. मूक मोर्चाच्या माध्यमातून शासनाला शांततापूर्ण पद्धतीने आपली मागणी पोहोचवण्यात आली.

मोर्चानंतर जिल्हा परिषद कार्यालय येथील पूनम गेट येथे एकत्रित जमा होऊन  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.