*बाभूळगाव मेंढापूरच्या माळावर उभी राहणार एमआयडीसी ?* *एमआयडीसी उभारणीसाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज*
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यात तसेच सबंध सोलापूर जिल्ह्यात, पंढरपूर एमआयडिसीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. राज्याच्या उद्योग विभागाने यासंदर्भात योग्य ती जागा सुचविण्यास सांगितले आहे. यामुळे ती जागा कोण सुचविणार ? आणि कोणती सुचविणार ? याकडे सबंध पंढरपूर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
कै. सुधाकरपंत परिचारक, कै. भारत भालके ,यांच्यासह विद्यमान आ. समाधान आवताडे, राष्ट्रवादीच्या व्यापारी तसेच उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप मांडवे, यांच्यासह डीव्हीपी ग्रुपचे अध्यक्ष उद्योजक अभिजीत पाटील, यांनी पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसी उभारणीसाठी प्रयत्न केले होते .राज्याच्या उद्योग विभागांने यासंदर्भात सर्व जणांना पत्र व्यवहार केला आहे. या पत्राद्वारे एमआयडीसीसाठी लागणारी जागा सुचविण्यास सांगितले आहे. ही जागा निवडताना योग्य त्या अटी आणि शर्ती यांची पूर्तता करण्यास सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसापासून आ. प्रशांत परिचारक तसेच आ. समाधान अवताडे यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आहे. लवकरच एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार ,असे पंढरपूर तालुकावासियांना वाटू लागले आहे. पंढरपूर एमआयडिसीचा प्रश्न तसा फारच जुना आहे. अनेक विधानसभा निवडणुका याच मुद्द्यावर लढल्या गेल्या होत्या .आता मात्र एमआयडीसी उभारणीसाठी ठोस कामाची गरज आहे. राज्याच्या उद्योग विकास विभागाने सांगितल्याप्रमाणे जागेची पूर्तता करण्यात कोण आघाडी घेणार ?उद्योग विभागाच्या पसंतीस पडणारी जागा उपलब्ध करून देणार ? याकडे पंढरपूर तालुका वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
विद्यमान आ.समाधान अवताडे पूर्ण ताकतीने जागा उपलब्ध करून देणार का ? याकडेही नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कै. सुधाकरपंत परिचारक यांच्यापासून उद्योजक अभिजीत अवताडे हे एमायडिसी उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत .पंढरपूर तालुक्यातील गार्डी, मेंढापूर, बाभुळगाव, आदींसह अनेक ठिकाणी सरकारी जागांसह पडीक जमिनी उपलब्ध आहेत .असे असले तरी मेंढापूर आणि बाभुळगावचा माळ , एमआयडीसीच्या उभारणीसाठी अनुकूल असल्याचे दिसत आहे. बाभुळगाव परिसरात उपलब्ध असणारी सरकारी आकारीपड जमीन(१०५ एकर) तसेच याचलगत मेंढापूर परिसरात असणारी सुमारे २०० एकर सरकारी जमीन उपलब्ध आहे. या जमिनी शेजारी शेकडो एकर पडीक खाजगी जमिनी उपलब्ध आहेत. खाजगी जमीनदारांना योग्य तो मोबदला दिल्यास, या जमिनी हस्तगत करणे सहज शक्य आहे. याशिवाय या जमिनी जवळून जाणारा बाह्यवळण रस्त्याचे कामही जलद गतीने सुरू आहे .या जमिनीजवळून जाणारा रेल्वे मार्ग आणि या जमिनीसाठी उपलब्ध होऊ शकणारे गुरसाळे बंधाऱ्यातूनचे पाणी , या सर्व गोष्टीनी ही जमीन, उद्योग विभागाने घातलेल्या अटी आणि शर्तीप्रमाणे सर्वोत्कृष्ट अशी आहे. यामुळे बाभुळगाव, मेंढापूर परिसरातील माळ ,पंढरपूर एमआयडिसी उभारण्यासाठी अनुकूल असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सहाजिकच पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आ. समाधान अवताडे यांच्यासह आ. प्रशांत परिचारक राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे, संदीप मांडवे, उद्योजक अभिजीत पाटील यांच्यासह एमायडिसी उभारण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वच नेतेमंडळींनी, या जमिनीची निवड करून उद्योग विभागास कळवणे गरजेचे आहे. या जमिनी व्यतिरिक्त सर्व सोयींनी युक्त अशी दुसरी जमीन पंढरपूर तालुक्यात तरी उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.