समाधान काळे यांचाही जामीन मंजुर* *कारखाना प्रशासनाने केले होते बेदखल !*

समाधान काळे यांचाही जामीन मंजुर*  *कारखाना प्रशासनाने केले होते बेदखल !*

 पंढरपूर /प्रतिनिधी 

श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या थकित कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने संचालक मंडळावर दाखल केलेल्या गुन्हयात संचालक समाधान वसंतराव काळे यांचाही  अटकपुर्व जामीनअर्ज  न्यायालयाने मंजुर केला आहे. समाधान काळे हे विरोधी पक्षाकडून निवडणुक आल्याने कारखाना प्रशासनाने त्यांना बेदखल करीत इतर संचालकांचे जामीन मंजुर करुन घेतले होते.

            श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेने ठरवून दिलेली साखर विक्रीतील रक्कम विहित कालावधीमध्ये बँकेकडे भरणा केली नाही याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी मागणी करुनही चेअरमन व संचालक मंडळाने त्याकडे जाणीवपुर्वक दर्लक्ष करीत  बँकेची कर्जाऊ रक्कम थकवली म्हणून राज्य सहकारी बँकेच्या वतीने तालुका पोलिस ठाण्यात चेअरमन अभिजीत पाटील व संचालक मंडळाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरुन मागील पंधरा दिवस तालुक्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चेअरमन अभिजीत पाटील यांनी पंढरपूर सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता व तो मंजुरही झाला होता.

            कारखान्याच्या निवडणुकीत समाधान वसंतराव काळे हे विरोधी गटाचे एकमेव संचालक संस्था प्रतिनिधी म्हणून विजयी झाले आहेत.  कारखाना प्रशासनाकडून काळे यांना वगळून इतर सर्व संचालकांचे अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते व त्या सर्वांना न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजूरही केले होते. मात्र समाधान काळे यांचा एकमेव जामीन अर्ज कारखाना प्रशासनाकडून न्यायालयासमोर ठेवण्यात आला नव्हता. काळे यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणूकीत पाटील यांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली होती.

            आज समाधान काळे यांनी ॲड.तानाजी सरदार यांचेमार्फत न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज ठेवला युक्तीवादानंतर न्यायालयाने तो मंजूर केला.

चौकट :

निवडणुकीनंतर आपण कुठेही संस्थेच्या कामकाजामध्ये अडथळा आणला नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत वेळोवेळी सहभागही घेतला.  गुन्हा दाखल झालेनंतर मी स्वत: कारखान्यावर वकिलपत्रावर जामीन अर्जासाठी सही केली आहे. तरीही मला वगळून कारखाना प्रशासनाने इतर संचालकांचे जामीन अर्ज मंजूर करुन घेतले आहेत. ही बाब मला पोलिसांकडून समजली म्हणून मी वैयक्तिक जामीन अर्ज दाखल केला. याबबत मी चेअरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.

समाधान वसंतराव काळे