*वारकरी वेशात अभिजीत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज* * प्रचंड उत्साही वातावरणात दिसून आली सभासद मंडळींची वारीसारखी दिंडीच*

*वारकरी वेशात अभिजीत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज*  * प्रचंड उत्साही वातावरणात दिसून आली सभासद मंडळींची वारीसारखी दिंडीच*

पंढरपूर /प्रतिनिधी

डोक्यावर वारकरी फेटा गळ्यात पंचा, तोबा गर्दीच्या साक्षीने अभिजीत पाटील बैलगाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, आणि पंढरपूरमधील वातावरण बदलून गेले. टाळ-मृदुंगाच्या आवाजात ही मिरवणूक प्रांत कार्यालयाच्या दिशेने निघाली, आणि प्रांत कार्यालयात पोहोचल्यानंतर अभिजित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


विठ्ठल कारखान्याची निवडणूक रंगत चालली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवट दिवस होता. मंगळवार आणि बुधवारी सत्ताधारी भालके आणि पाटील गटांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित पाटील यांनी आपला अर्ज मोठे शक्तिप्रदर्शन दाखवत दाखल केला.


सकाळी नऊच्या सुमारास येथील शिवाजी चौकात गर्दी होऊ लागली. या गर्दीचे रुपांतर हळूहळू मोठ्या गर्दीत झाले  अभिजित पाटील यांनी वारकरी वेशात या ठिकाणी पदार्पण केले. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठलास साकडे घातले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, याशिवाय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले  शिवतीर्थावर सभा सुरू झाली. या सभेत १०७ वर्षीय कृष्णात तळेकर यांनी दंड थोपटून अभिजीत पाटील विजयी होणार असल्याची खात्री दिली.


अभिजित पाटील यांनी यावेळी साखर कारखान्यातील बारकावे सभासदांना किस्सामय पद्धतीने सांगितले. साखर कारखाना चालविणे जितके अवघड तितकेच सोपेही आहे. भ्रष्टाचाराची कीड लागल्यास कारखानदारी नष्ट होते, विरोधकांकडे कारखान्याच्या विकासाचा कोणताही मुद्दा नाही. कारखाना बंद पाडून आता पुन्हा निवडणुकीत उभे आहेत. अफवा पसरवणे आणि सभासदांचे लक्ष दुसऱ्याच मुद्द्याकडे परावर्तित करणे यासारखी कामे विरोधक करीत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता विठ्ठल कारखाना सभासदांचाच आहे आणि सभासदांचाच राहील, अशी खात्री त्यांनी दिली. विठ्ठल कारखाना कसा चालू करणार ? यावर विरोधकांनी बोलावे अशी तोफ अभिजित पाटील यांनी डागली. विठ्ठल कारखाना फक्त तीन वर्षात कर्जमुक्त होऊ शकतो , असे ठणकावून सांगितले. सभासदांनी विश्वास दाखवल्यास सभासदांची ऊस बिले, वाहतूक बीले आणि कामगारांचे पगार देऊन, येणारा गळीत हंगाम सुरू करू असे आश्वासन यावेळी सभासदांना दिले.


चौकट

सभासदांचे पैसे दिल्याशिवाय उमेदवारी अर्जही भरणार नाही, अशी ग्वाही चेअरमन भगीरथ भालके यांनी दिली होती. विरोधी गटातील युवराज पाटील हेही कारखाना कर्जात असताना विठ्ठलचे संचालकच होते. या सर्वांनीच पुन्हा निवडणुकीत अर्ज दाखल केले आहेत. सभासदच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे मत अभिजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.