*केवळ पंढरपूर तालुक्यातीलच प्रस्ताव कसे ; सीईओनी थेट विचारले ; शेळकंदे यांच्या जबाबदारीवर विषय मंजूर.* *करकंब, फुलचिंचोली, चळे यासह चार गावांसाठी गाळे बांधण्यासाठी दिला होता प्रस्ताव.*

सोलापूर :/- विशेष प्रतिनिधी
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली. या सभेमध्ये ग्रामपंचायत विभागाचा एक विषय होता, त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील करकंब, फुलचिंचोली, चळे यासह चार गावांमध्ये ग्रामपंचायत विभागाकडून गाळे बांधायचा प्रस्ताव निधी देण्यासाठी आला होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सभेसमोर वाचून मंजुरीसाठी ठेवला. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केवळ पंढरपूर तालुक्यातीलच प्रस्ताव कसे काय आले इतर तालुक्यातील एक पण प्रस्ताव का नाही? असा आश्चर्यजनक प्रश्न केला.
समोर बसलेल्या सर्व गटविकास अधिकाऱ्यांनाही विचारणा झाली, तुमच्याकडे प्रस्ताव नाही आले का? पंढरपूर वगळता कोणाचाही विषय नसल्याचे स्पष्ट झाले मात्र सीईओ स्वामी यांनी या विषयाला मंजुरी देण्यास उशीर लावला शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांच्या जबाबदारीवर या विषयाला मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या सर्व रेस्ट हाऊसचे स्ट्रक्चर ऑडिट करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. सांगोल्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी रेस्ट हाऊसला निधी देण्याची मागणी केली त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केवळ सांगोलाच नाही तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या रेस्ट हाऊसची दुरावस्था झाली आहे. डेप्युटी इंजिनियर काय करतात असा सवाल करताना त्यांनी आपली वास्तू देखरेखी साठी तुम्ही व्यक्ती ठेवू शकत नाही का? हे जिल्हा परिषदेचे दुर्दैव आहे अशी नाराजी व्यक्त केली. जर सेसमध्ये तरतूद असेल तर पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व रेस्ट हाऊसचे स्ट्रक्चर ऑडिट करून नूतनीकरणासाठी किती खर्च येईल याचे अंदाजपत्रक तयार करून सादर करावे अशा सूचना त्यांनी केल्या.