नियंत्रित दरात रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात*-- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी*

पंढरपूर: प्रतिनिधी
-जिल्ह्यात योग्य,नियंत्रित दरात रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी दिली.
संपुर्ण जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यापासून रुग्णांना घेऊन जाण्यासाठी खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे.शासन स्तरावर अशा रुग्णवाहिकांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे नोंद ठेवली जाते, तसेच सदर रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या सुविधांनुसार व वाहन प्रकारानुसार वाहतूकीसाठी त्यांचे दर निश्चित केले जातात.सदरचे दरपत्रक प्रत्येक रुग्णवाहीकेमध्ये ठळक अक्षरात दर्शनी भागामध्ये लावणे सक्तीचे केले आहे. परंतु सध्या आपल्या जिल्ह्यात या शासकीय दरांच्या अंमलबजावणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.त्याचा परिणाम म्हणून संकटात असलेल्या रुग्णांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात, अवाजवी शुल्काची मागणी रुग्णवाहिका चालकांकडून केली जात आहे.कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मागेल ते शुल्क देणे भाग पडत आहे.
लॉकडाऊनमुळे तसेच उपचाराच्या खर्चामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना,प्रचंड आर्थिक संकटला व मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णवाहिका चालकाने घेतलेल्या शुल्काची कोणतीही पावती दिली जात नाही.ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद असलेल्या सर्व रुग्णवाहिकांची, तालुकास्तरावरील कंट्रोल रूममध्ये नोंदणी केली जावी व मागणी नोंदवलेल्या रुग्णांना शासकीय दरामध्ये ती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच रुग्णवाहिका चालकाकडून ज्यादा शुल्क आकारल्यास,तक्रार करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने संपर्क क्रमांक जाहीर करावेत आणि संकटात सापडलेल्या नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हाध्यक्ष विनोद भरते, प्रांत विषय समिती प्रमुख दीपक इरकल, जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते,नंदकुमार देशपांडे ,सोलापूर संघटक विश्वनाथ खटावकर
यांनी केली आहे.