*पंढरीतील मेहतर समाजाच्या घराच्या प्रश्नासाठी मनसेची उडी* *मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचेकडून मुख्यमंत्री शिंदे यांना घातले साकडे* *मुख्यमंत्र्यांनीही दिल्या आहेत नगरविकास विभागाचे मुख्य सचिवाला कार्यवाहीच्या सूचना*

*पंढरीतील मेहतर समाजाच्या घराच्या प्रश्
पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील मेहतर समाजाच्या घरांच्या प्रश्नासाठी मागील अनेक वर्षापासून प्रयत्न केले जात आहे. मात्र या विषयाला गांभीर्याने पाहिले जात नव्हते. अशातच या गंभीर प्रश्नाकडे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी लक्ष दिले असून, हा प्रश्न सोडवून दाखवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडेच साकडे घातले आहे.
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मेहता समाजातील घरांच्या प्रश्नाबाबत लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सदर प्रश्नाबाबत नगर विकास विभागाचे मुख्य सचिव यांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे मनसेच्या शिष्टमंडळानी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळेल आशी आशा निर्माण झाली आहे.
पंढरपूर शहरातील 136 वर्षापासून मानवी विष्टा उचलणाऱ्या मेहतर समाजातील 213 कुटुंबांच्या गृहप्रकल्पास विशेष बाब म्हणून मंजुरी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या 136 वर्षापासून पंढरपूर येथे मेहतर समाज राहत असून या समाजाने मानवी विस्टा हाताने उचलून पंढरपूर शहर आणि चंद्रभागा वाळवंट स्वच्छ ठेवण्याचे काम मेहतर समाजाने केले आहे.
आज देखील संपूर्ण पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचे काम या समाजातील लोक करत असून या समाजातील कुटुंबांना राहण्यासाठी घरे नाहीत. ही सर्व कुटुंब आज देखील नगरपालिकेच्या जागेत पत्र्याच्या घरात राहत असून या समाजाच्या वतीने घरासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली परंतु अद्याप पर्यंत या समाजाला न्याय दिला गेला नाही. या समाजासाठी घरे देण्यासंदर्भात माननीय हायकोर्टाने आदेश देऊन देखील नगरपालिकेने जाणून बुजून दुर्लक्ष केलेले आहे. असेही मुख्यमंत्री यांचे निदर्शनास आणून दिले आहे.
या समाजाच्या निवासस्थानासाठी नगरपालिकेकडे डी. पी. आर.प्लॅन तयार असून गेल्या 136 वर्षापासून नगरपालिकेच्या हद्दीतील जागेत हा समाज एकाच ठिकाणी राहत आहे. वारंवार शासन दरबारी बैठक होऊन देखील या समाजाला अद्याप पर्यंत न्याय मिळाला नसून हा समाज निस्वार्थपणे भाविकांना चांगल्या सुविधा पुरवत आहे.
तरी कृपया आपण स्वतः जातीने लक्ष घालून पंढरपूर शहरातील मेहतर समाजाच्या गृह प्रकल्पास मंजुरी देण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी केल्यामुळे मुख्यमंत्री यांनी दखल घेत कार्यवाहीस सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री यांना निवेदन देताना मनसेचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर उपस्थित होते.
चौकट
*नगरपालिकेचा बंद पडलेला दवाखानाही लवकरच सुरु होणार*
पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेला दवाखाना सध्या बंद अवस्थेत आहे. त्याबाबतीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी लेखी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असता, त्याबाबतही त्वरित कार्यवाही होणेबाबत नगरविकास विभागाचे मुख्य सचिव यांना कार्यवाही होणे बाबतची सूचना दिली आहे. त्यामुळे पंढरीतील गोरगरिबांसाठी उपयुक्त असलेला नगरपालिकेचा दवाखाना सुरू होईल अशी अपेक्षा वाढली आहे.