*निस्पृह समाजसेवेचा मानबिंदू – ॲड.गणेशदादा पाटील*.

*निस्पृह समाजसेवेचा मानबिंदू – ॲड.गणेशदादा पाटील*.

करकंब /प्रतिनिधी 
           सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा.गणेशदादा राजूबापू पाटील यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने....... 
                 माणूस हा समुहात राहाणारा प्राणी आहे.या समूहाला एकत्रितपणे घेऊन सकारात्मक दृष्टीकोन ठेवत सर्वांगीण विकास साधने म्हणजेच नेतृत्व करणे होय.या करीता अहंकार बाजूला ठेवून सर्वांसाठी समान उद्दिष्ट ठेवून नियोजनबद्ध समाजसेवा करावी लागते.अशी समाजाची निस्वार्थ सेवा करणारे भोसे गावातील वै.यशवंत भाऊ पाटील यांचे कुटुंब आणि याच कुटुंबाचा वारसा चालवणारे स्व.राजूबापू पाटील यांचे चिरंजीव आदरणीय गणेश दादा पाटील हे पाटील घराण्याची तिसरी पिढी म्हणून खऱ्या अर्थाने नेतृत्व करीत आहेत. गणेश दादांचा जन्म ०९ जानेवारी १९८८ रोजी झाला.मुळात पाटील घराणे हे वारकरी परंपरा जोपासणारे असल्याने आणि वै.यशवंत भाऊ व स्व.बापूंच्या  रूपाने घरातील राजकीय वातावरणातच गणेश दादा लहानाचे मोठे झाले आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण पंढरपूर आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी तर उच्च माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केले.भारती विद्यापीठातून त्यांनी एल.एल.एम ची पदवी पूर्ण केली.शिवाय सोलापूर विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयाची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागं न लागता आपण घेतलेल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर गावच्या व समाजाच्या विकासासाठी करण्याचा मानस असलेने त्यांनी गावच्या राजकारणात प्रवेश केला.
                २०१५ मध्ये ग्रामपंचायतचे पहिल्यांदा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर उपसरपंच पदी निवड झाली. भोसे ग्रामपंचायतच्या इतिहासात सर्वात कमी वयात उपसरपंच होण्याचा मान गणेश दादांना मिळाला.याच काळात खऱ्या अर्थाने दादांनी आपल्या कामातून नेतृत्वाची चुणूक दाखवायला सुरुवात केली.अशातच मागील दोन वर्षापूर्वी कोरोना लाटेत दादांचे चुलते महेश पाटील त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील राजहंस म्हणून ज्यांची ओळख होती ते गणेश दादांचे वडील आदरणीय राजूबापू पाटील यांचेही दु:खद निधन झालं. पाटील घरावर  आणि भोसे गावावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. गणेश दादांना एवढ्या कमी वयात एवढं दु:ख पचवणं शक्य नसताना देखील स्वत:ला,कुटुंबाला आणि आख्ख्या गावाला दु:खातून सावरलं. आता घरातील आणि गावची सर्व जबाबदारी गणेश दादांवर पडली. दु:खानं खचून न जाता,न डगमगता दादांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली.वै.भाऊंच्या स्वप्नातील शेतकऱ्यासाठीचा स्व.बापूंनी उभा केलेला ‘कृषिराज शुगर’कारखाना,घरची शेती आणि गावचा विकास या सर्वच जाबाबदाऱ्या गणेश दादा अत्यंत चोख आणि कुशलतेने सांभाळत आहेत.
                  हे सगळं करत असतानाच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सोलापूर (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष पद गणेश दादांना मिळाले. पक्ष संघटन,पक्ष मजबुतीकरण,पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचविण्याचे काम या माध्यमातून दादांनी केले.समाजकारण आणि बेरजेचे राजकारण करत असताना शिक्षण क्षेत्रात देखील सध्या वेगवेगळ्या समितीवर दादांची नेमणूक केली आहे. त्यात प्रामुख्याने रयत शिक्षण संस्थेचे के.बी.पी.कॉलेज पंढरपूर ची महाविद्यालयीन विकास समिती तसेच भोसे येथील यशवंत विद्यालय स्कूल कमिटीचे चेअरमन आणि सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. गणेश दादांच्या ह्या सर्व कामांचा आवाका पाहून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी गणेश दादांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी नेमणूक केली.याच संस्थेत सर्वात कमी वयाचा जनरल बॉडी सदस्य म्हणून दादांची ओळख झाली.
                    वै.यशवंत भाऊ व स्व.बापू यांचा वारसा पुढे चालवत असताना दादा गावातील ज्येष्ठांचा मान ठेवत त्यांचा आशीर्वाद घेत युवकांना बरोबर घेऊन गावच्या विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम करत आहेत.हे थोडं म्हणून की काय गावातील यशवंत भाऊ पाटील पतसंस्था,विविध कार्यकारी सेवा सोसायट्या,कालवा पाणी वापर संस्था,आधारवड फाउंडेशन इ. व अशा अनेक संस्थांचे मार्गदर्शक आहेत. अगदी कमी कालावधीत दादांनी आपल्या कामाची चुणूक कृतीतून दाखवल्याने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांच्या कामाची दाखल घेऊन २०२० सालचा हरभरा उत्पादन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्याना पुरस्कार दिला गेला.त्याचबरोबर उत्कृष्ठ कार्यकारी संचालक म्हणून नवराष्ट्र सहकार परिषदेने त्यांचा गौरव केला.जनकल्याण फाउंडेशनचा जनकल्याण गौरव पुरस्कार२०२१त्यांना मिळाला आहे. हे सर्व मिळालेले पुरस्कार म्हणजे दादांनी केलेल्या कामाची पोच पावतीच म्हणावी लागेल.भोसे ग्रामपंचायतचे उपसरपंच व विद्यमान सरपंच असताना याकाळात ग्रामपंचायतीचा कायापालट करून जिल्ह्यातील पहिला स्मार्ट ग्राम पुरस्कार २०१६-१७चा मिळवला. आयएस ओ ९००१-२०१५ प्रमाणपत्र मिळाले.म.गांधी तंटामुक्त अभियान विशेष पुरस्कार मिळाला.दै.लोकमत सरपंच पुरस्कार(२०१७) दै.प्रतीवीर उत्कृष्ठ प्रशासन पुरस्कार इ. पुरस्कार दादांच्या काळात ग्रामपंचायतला मिळाले आहेत. 
             एवढं सगळं करत असताना गणेश दादा यशाने कधी हुरळून गेले नाहीत की अपयशाने कधी खचून गेले नाहीत.वै.यशवंत भाऊंनी व स्व.बापूंनी निस्पृह समाजकारणाचा जो आदर्श घालून दिला तो तसाच पुढे आदर्शात्मक पद्धतीने अविरतपणे तो वारसा आजही त्यांनी आपल्या कार्य कृतीतून जपला आहे.थोर तत्ववेत्ता आर.बी.कॅटेलच्या मते ‘नेता म्हणजे समूहास त्याच्या उद्दिष्ठाप्रत व उत्कर्षाप्रत नेणारी,त्यासाठी मार्गदर्शन करणारी.मार्गातील अडचणींचे निराकरण करणारी व समूहाकडून योग्य ते काम करून घेणारी श्रेष्ठ दर्जाची व्यक्ती’मला असं वाटतं या संकल्पना गणेशदादांना तंतोतंत लागू पडते.यातील प्रत्येक शब्द दादांच्या कृतीला जोड देणारा ठरतो आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आजवर दादांनी रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी,वृक्षारोपण,अपंग व दिव्यांगासाठी शासनाच्या विविध योजनांचे लाभ लाभार्त्याला मिळवून दिले आहेत.कोरोना कालावधीत गरजूंना अन्नधान्य  वाटप,युवकांसाठी उद्योजकता शिबिर,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर,क्रीडा व वक्तृत्व स्पर्धा या बरोबरच कवी व बाल साहित्य संमेलन इ.व असे अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आहेत.
     
                                                                        
प्रा.राम मुजमुले (उंबरे).
यशवंत माध्य व उच्च माध्य. विद्यालय,भोसे