*गाव अंधारात..... अन पुढारी उजेडात......!* *रस्त्यावरची लाईट झाली पुन्हा गायब*
करकंब /प्रतिनिधी.
करकंब गाव संपूर्ण अंधारात.
महावितरणचे बिल थकल्यामुळे पुन्हा रस्त्यावरची लाईट बंद करणेत आली आहे. गावातील हायमास्ट दिवे बंद असल्यामुळे सर्वत्र अंधार दिसत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यातच अंधाराचे साम्राज्य पसरल्याने विषारी प्राण्यांचा वावर वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने शुक्रवार पेठ मेन रोड आदीसह करकंब गाव अंधारात पुढारी मात्र उजेडात असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. अशा परिस्थितीत महावितरण व ग्रामपंचायत ने त्वरित पावले उचलून स्ट्रीट लाईट सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे थकीत बिल 10 लाखाहून अधिक आहे.मागिल काही दिवसांपूर्वी
उपमुख्यमंत्र्यांनी लाइट सुरू करण्याचे आदेश दिले होते काही दिवस लाईट चालू झाली . पण पुन्हा या रस्त्यावरची वीज गायब झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
ग्रामपंचायत प्रशासनाकडे विज बिल भरण्यासाठी, थकबाकी भरण्यासाठी वसूल नाही व तरतूद नाही त्यामुळे बिल भरू शकत नाही असे मत व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायत कार्यालयाची जागा भाडे ,विद्युत खांबाला असणारे भाडे, ते थकीत वजा करून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्यास ग्रामपंचायत प्रशासन तयार आहे. अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्यामुळे गाव अंधारात आहे.
गावातील पाणीपुरवठाचे कनेक्शन ही अनेक ठिकाणी बंद आहेत थकीत बिल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही विज बिल कट केली असे मत उपअभियंता माने यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर महावितरणच्या कर्मचार्यांचा अभाव आहे रिक्त पद भरपूर आहेत ती भरली गेल्यानंतर गावात सुरळीत वीजपुरवठा करण्यात मदत होईल.