*कोतवाल सेवकांचा चतुर्थ श्रेणी सेवेत समावेश करावा* *कोतवाल कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे*

*कोतवाल सेवकांचा चतुर्थ श्रेणी सेवेत समावेश करावा*  *कोतवाल कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे*

पंढरपूर (प्रतिनिधी)

 राज्यातील कोतवाल सेवकांच्या सेवेचा समावेश चतुर्थश्रेणीमध्ये करावा, त्यांना किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. आषाढी महापूजेसाठी पंढरपूरमध्ये आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोतवाल संघटनेकडून साकडे घालण्यात आले.


राज्यातील १२५३६ पेक्षा अधिक कोतवाल सेवक आजही तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. महसूल विभागातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या या कोतवाल सेवकांच्या सेवेचा चतुर्थश्रेणी सेवेत सामावेश करावा, आणि त्यांना किमान वेतन देण्यात यावी, अशी मागणी कोतवाल कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली. यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेचे सोलापूर जिल्हा संघटक प्रल्हाद खरे, सचिव अनिल जाधव, पंढरपूर तालुका अध्यक्ष महेश खिलारे, उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे , सचिव अनिल सोनवले यांच्यासह या संघटनेचे अनेक कोतवाल सेवक उपस्थित होते.

राज्यातील महसूल विभागातील अविभाज्य घटक असणारा कोतवाल, आजही तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. मुघल काळात या पदाची निर्मिती करण्यात आली, तेव्हापासून हा घटक महसुली विभागात कार्यरत आहे . दरमहा १६ रुपये मानधनावर काम करणाऱ्या कोतवाल सेवकास १ जानेवारी २०१२ पासून ५०१० रुपये मानधन करण्यात आले . यानंतर १ फेब्रुवारी २०१९ पासून, यामध्ये २५०० रुपयांची वाढ करून, हे मानधन ७५१० इतके करण्यात आले. अत्यल्प मानधनावर काम करणारा कोतवाल, आजही महसूल विभागातील जबाबदार घटक म्हणून भूमिका बजावत आहे. राज्यातील कोतवाल सेवकाचा चतुर्थ श्रेणी सेवेमध्ये समावेश करावा, आणि त्यास किमान वेतन देण्याची मागणी सातत्याने होत आहे. यापूर्वी कोतवाल संघटनेकडून आंदोलनेही करण्यात आली होती , परंतु आजवर त्यास यश आले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी एकमेव आहेत. पंढरपूर येथील आषाढी महापूजेसाठी ते पंढरपूर येथे आले होते. याप्रसंगी कोतवाल कर्मचारी संघटनेने त्यांना साकडे घातले आहे. त्यांच्या नेतृत्व काळात , राज्यातील कोतवाल सेवकांना न्याय मिळावा, ही अपेक्षा कोतवाल संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

चौकट

मोगल काळापासून अस्तित्वात असलेले कोतवाल सेवकाचे पद आजही सेवक म्हणूनच कार्यरत आहे.  तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. महसूल विभागातील जबाबदार घटक असूनही, त्यास महसूल कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालेला नाही. राज्यातील कोतवाल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणी सेवेत करून, त्यांना वेतन सुरू करण्याची मागणी राज्यातील कोतवाल कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे.