*दुचाकी चोरांची टोळी जेरबंद* *२९ दुचाकी जप्त,४ जणांना अटक* *पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई*
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरसह सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात, पंढरपूर शहर पोलिसांना यश आले आहे. यातील ४ दुचाकीचोरांना ताब्यात घेत, २९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या एक वर्षात चोरीस गेलेल्या १११ मोटारसायकली, पंढरपूर शहर पोलिसांनी मिळविल्या आहेत. शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
पंढरपूर शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पंढरपूर नगरीत आजवर अनेक मोटारसायकली चोरी गेलेल्या आहेत. शहर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या चोरांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले आहे. महेश कांतीलाल नवले (वय २१) रा.अकोले (बु), ता. माढा, सिद्धार्थ उर्फ अमर संजय मुसळे (वय २३) रा. परिते ता. माढा, सदाशिव महादेव फडतरे (वय २८) रा. तुंगत ता. पंढरपूर तसेच सोमनाथ उर्फ दादा दिलीप वाघमारे (वय २२) रा. कंदर ता. करमाळा या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेस पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदूम आणि इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर शहरातील मोटारसायकल चोरीतील गुन्ह्याचा तपास करीत असताना, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना , अकोले बुद्रुक येथील महेश नवले या इसमावर चोरीचा गुन्हा केल्याचा संशय आला.त्याच्यावर पाळत ठेवली असता, पोलिसांना पक्की बातमी मिळाली.नवले आणि त्याचा साथीदार चोरी केलेली मोटर सायकल घेऊन शहरातील एसटी बस स्टँड परिसरात विक्री करण्यात येणार आहेत. लागलीच सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळवले. सदरच्या मोटरसायकलीबाबत चौकशी केली असता, सदरची मोटरसायकल इंदापूर येथून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले. याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. आणि अकोले बुद्रुक येथील महेश नवले यास अटक करण्यात आली. नवले आणि त्याचा परिते येथील साथीदार अमर मुसळे यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत आणखी मोठी माहिती पोलिसांच्या हाती आली.
या दोघांनी मिळून पंढरपूर शहर , इंदापूर , नातेपुते, वालचंद नगर , यवत, कोथरूड, कुर्डूवाडी, माळशिरस , बंडगार्डन, खडक , बारामती, भोसरी, आणि सांगली या ठिकाणाहून मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले. यावरून दोघांना अटक करण्यात आली. महेश नवले याच्याकडून ८ तर, संजय मुसळे यांच्याकडून ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या दोघांनी चोरी केलेल्या काही मोटरसायकली तुंगत ता. पंढरपूर येथील सदाशिव फडतरे याच्याकडे विक्री करण्यास दिल्या असल्याचे सांगितले . यावरून फडतरे यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सदर गुन्ह्यातील नवले आणि मुसळे याने काही मोटरसायकली कंदर ता. करमाळा येथील सोमनाथ उर्फ दादा वाघमारे याच्याकडे विक्री करण्यास दिल्या असल्याचे सांगितले असता , त्याच्याकडून ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे चोरीस गेलेल्या २९ मोटरसायकली जप्त करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस कर्मचार्यांना यश आले आहे. या सर्व मोटरसायकली पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या असून, या गुन्ह्यातील सदर आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदूम, पो.हे.कॉ. शरद कदम , बिपिनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे , राजेश गोसावी, इरफान मुलांणी, पो.ना.इरफान शेख, शोएब पठाण , महेश पवार, संजय गुटाळ , सुनील बनसोडे, सुजित जाधव , पो.कॉ. समाधान माने, विनोद पाटील, अर्जुन केवळे , अन्वर दातार यांनी केली असून ,सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. सुनिल बनसोडे आणि महेश पवार हे करीत आहेत.