*लोकशाही प्रगल्भ बनविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची – प्रा. सिद्धार्थ ढवळे*
पंढरपूर – ‘शिक्षण आणि पत्रकारिता’ हे समाजजीवनाचे दोन डोळे आहेत. समाजातील चांगुलपणा अधिक वाढविण्यासाठी शिक्षक आणि पत्रकार यांनी अधिकची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले होते. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वृत्तपत्राच्या स्वरुपात फार मोठी क्रांती झालेली दिसते. अधिक वेगाने माध्यमांचा विकास होत असल्याने तो वेग पकडण्याची सर्वांना घाई झाली आहे. लोकशाही अधिक प्रगल्भ बनविण्यासाठी शाळा-महाविद्यालये आणि प्रसार माध्यमांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे’.असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सिद्धार्थ ढवळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील प्रसिद्धी विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘मराठी पत्रकार दिना’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात भूमिका व्यक्त करत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे होते.
प्रा. सिद्धार्थ ढवळे पुढे म्हणाले की, “पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. लोकशाहीला प्रगल्भ व प्रभावी बनविण्यात वर्तमानपत्राचा वाटा महत्त्वाचा असतो. चांगली वर्तमानपत्रे ही समाजाची गरज असून चांगले नागरिक घडविणे हे शिक्षकाचे काम आहे. शिक्षणातून विवेकशील नागरिक घडविणे आणि त्यांचे चांगुलपण टिकविणे ही समाजाची फार मोठी गरज आहे. शैक्षणिक संस्थामधून पत्रकारांचा होणारा गौरव पत्रकाराची सामाजिक जाणीव वाढविणारा आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “स्वाभिमानी पत्रकार हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. जनसामान्यांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहचविण्याचे कार्य वर्तमानपात्रांना करावे लागते. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून सामाजिक विकासाचे ते व्रत आहे. व्रतस्थ भूमिकेने केलेली पत्रकारिता समाजाला विकासाच्या दिशेने घेवून जाते. शैक्षणिक संकुलात पत्रकारांचा सन्मान करणे म्हणजे पत्रकारांनी केलेल्या सामाजिक कार्याची पोहचपावतीच असते.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ. दत्ता डांगे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंढरपुरातील चाळीसहून अधिक पत्रकारांचा डायरी, पेन व गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम मर्यादित पत्रकार प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात आला.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास संजय शहा यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश शिंदे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुशील कुमार शिंदे यांनी केले.
....................................................................................................................................................