*व्यापाऱ्यांची घंटा ... संघटनांची साद .. मनसेचे आव्हान .. . घुमला नाद ..*.. *संचारबंदीस पंढरीत जोरदार विरोध ..*..

पंढरपूर (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उठ सूट लागू होणाऱ्या लॉकडाऊन आणि संचारबंदीस पंढरीतील व्यापारी वर्ग कंटाळला आहे. यामुळे येत्या १३ तारखेपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीस तीव्र विरोध होत आहे. येथील व्यापाऱ्यांनी मंगळवारी घंटानाद आंदोलन पुकारले होते . या आंदोलनास येथील अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. यावर कळस मनसेकडून चढवण्यात आला. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रशासनासच चक्क आव्हान दिले. कोणत्याही व्यापाऱ्याने प्रशासनास घाबरू नये , दुकाने सुरू ठेवावीत, होणारा दंड मनसेकडून भरण्यात येईल, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याअगोदर आमच्यावर कारवाई करा, असे आव्हान प्रशासनास दिले, आणि धोक्याच्या घंटेचा नाद प्रशासनाच्या कानावर पडला.
कोरोला संसर्गाच्या आकडेवारीवरून, जिल्ह्यातील पाच तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या १३ तारखेपासून पंढरपूर, करमाळा, माढा , माळशिरस आणि सांगोला तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीस पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध करण्याचे ठरवले आहे. दोन दिवसापूर्वी व्यापारी महासंघाची बैठक आ. प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली होती . या बैठकीत मोठे विचारमंथन झाले. कोणत्याही परिस्थितीत संचारबंदी स्वीकारायची नाही , प्रशासनाच्या निर्णयाचा कडाडून विरोध करण्याचे धोरण ठरविण्यात आले. यानुसार १० ते १२ ऑगस्ट या तीन दिवसात घंटानाद आंदोलन , अर्धनग्न आंदोलन, तसेच धरणे आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
व्यापारी वर्गाने ठरवल्याप्रमाणे मंगळवारी पंढरीत घंटानाद आंदोलन पार पडले. या आंदोलनात बघता-बघता अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. अनेक महिन्यांपासून नुकसानीची झळ सोसत असलेल्या व्यापाऱ्यांनी संचारबंदीचा कडाडून विरोध केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संचारबंदी झुगारून देण्याचे आव्हान व्यापाऱ्यांना केले. याचवेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी संचारबंदी काळात व्यापाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही , आपली दुकाने खुलेआम खुली ठेवावीत, प्रशासनाकडून दंड करण्यात आल्यास , हा दंड मनसेकडून भरण्यात येईल , असे व्यापाऱ्यांना आवाहन केले . याचवेळी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याअगोदर प्रशासनाने मनसेसह इतर पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी , असा इशारा प्रशासनास दिला , आणि बघता बघता व्यापाऱ्यांचे घंटा नाद आंदोलन प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरले.
पंढरीतील व्यापाऱ्यांच्या या आंदोलनात , मनसे नेते दिलीप धोत्रे, युवा नेते प्रणव परिचारक , मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ अवताडे , मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे , सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
पंढरीतील व्यापाऱ्यांनी संचारबंदीस मोठा विरोध दर्शविला आहे. पंढरीत आंदोलनांची मालिकाच सुरू केली आहे. मंगळवारी पुकारलेल्या घंटानाद आंदोलनास, अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी तर प्रशासनास खुले आव्हान दिले . संचाबंदी तर झुगारणारच ..व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी प्रशासनास आपल्यावर गुन्हे दाखल करावे लागतील, असा गर्भित इशाराही दिला. मनसेच्या या पवित्र्याने धोक्याच्या घंटेचा आवाज प्रशासनाच्या कानी पडला आहे.