*कॅनॉल बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न चाळीस वर्षांपासून प्रलंबित पंढरपूर *:.

वार्ताहर/ पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील उजनी डावा कालवा वितरीका वरील बाधित शेतकर्यांना ४० वर्षांपासून भूसंपादनाची नुकसान भरपाई व संपादित जमिनीचा मोबदला तुटपुंज्या स्वरूपाचा तर काही शेतकर्यांना मोबदला मिळाला नाही. जमीनीचा मोबदला मान्य नसल्याने शेतकर्यांनी रक्कम घेतली नसून संपादित जमिनीचा मोबदला समृध्दी महामार्ग व पालखी महामार्गाप्रमाणे सरसकट विना अट मिळावा अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत नलवडे यांनी मुख्यमंञी व जलसंपदामंञी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
पंढरपूर तालुक्यातून उजनी डावा कालवा वितरीका व कॅनॉल ९ ते १० गावातून जवळपास १५ हजार शेतकर्यांच्या बागायती जमिनीतून उजनी डाव्या कालव्याच्या वितरीकेचे वेग - वेगळे फाटे रोपळे , आढीव, नारायण चिंचोली, बाभूळगाव, देगाव, ईश्वर वठार, तुंगत ता.पंढरपूर येथून गेले आहेत. यामध्ये जवळपास १५ हजार शेतकर्यांची ५ हजार एकर जमिन भुसंपादित करुन कालव्याचे काम पुर्णत्वास नेले आहे. असंख्य शेतकरी भूमिहीन झाले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून पिक पाण्याची नोंद चुकीची लागली असल्याने बागायती जमिनीदेखील कोरडवाहू नोंद झाल्याने मोबदला तुटपुंजा मंजूर झालेला आहे तर काहींना मोबदला दिलेला नाही. मोबदला मान्य नसल्याने शेतकर्यांनी रक्कम उचललेली नसल्याने कोटयावधीची रक्कम पाटबंधारे विभागाकडे पडून असून अधिकारी कोणतीच दखल घेत नाहीत.
अधिकार्यांकडे वारंवार पाटपुरवठा करुन देखील उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. एकीकडे ४० वर्षांपासून भुसंपादित झालेल्या जमिनी कसता येत नाहीत आणि शासनाकडून योग्य मोबदलासुध्दा मिळत नाही. चालू परिस्थीतीत जमिनीचे खरेदि दर २२ ते २५ लाख प्रती एकर आहे. तर बाधित शेतकर्यांना शासनाची नुकसान भरपाई कमी मंजूर करण्यात आलेली आहे.याच कालव्याच्या जमिनी मंगळवेढा तालुक्यात ८२ हजार ६६० प्रित गुंठा, माढा तालुका ८५ हजार ते १ लाख २० हजार पर्यंत प्रित गुंठा, माळशिरस तालुका १ लाख १० हजार प्रित गुंठा, मोहोळ तालुका १ लाख १५ हजार प्रती गुंठा या दराने संपादित करण्यात आलेल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील वरील गाव ही भीमा नदी काठचे असून १०० टक्के बागायती आहेत.
यामधील काही गावे प्रधीकरणात असूनदेखील या भागातील बाधित शेतकर्यांना मंजूर केलेला नाही. तो शेतकर्यांना मान्य नाही एकीकडे ४० वर्षांपासून प्रलंबित मोबदला व दुसरीकडे ४० वर्षांपासून जमिनीतून मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. वितरेकेवरील बाधित शेतकर्यांना ४० वर्षांपासूनची नुकसान भरपाई व भुसंपादित केलेल्या जमिनीचा व्याजासहित मोबदला देण्याची मागणी केली आहे. यासंबंधित सर्व विभागांना जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत नलवडे यांनी निवेदने देण्यात आले आहे. निवेदनावर जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
चौकट १
अन्यथा प्रंताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...
उजनी डावा कालवा वितरीकावरील शेतक-यांच्या जमिनी शासनाने कामासाठी घेतल्या होत्या. परंतू शेतक-यांना याचा मोबदला अत्यल्प तर काहींना मोबदला मिळालाच नाही. प्रलंबित प्रश्नासंदर्भात शासन व प्रशासनाने लक्ष घालून सोडवावा अन्यथा प्रंताधिकारी कार्यालयासमोर ८ सप्टेंबरपासून आंदोलन करण्यात येईल.
श्रीकांत नलवडे, युवक जिल्हाध्यक्ष,
जनहित शेतकरी संघटना
चौकट २
बाधित शेतकर्यांना दिलासा मिळावा...
भूसंपादनबाधित शेतकर्यांना अनेक दिवसांपासून मोबदला मिळाला नाही. काहींना तोकडया स्वरुपात मिळाला आहे. परंतू सद्य परिस्थीती पाहता बाधित शेतकर्यांना तातडीने मोबदला मिळाल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीची कार्यवाही करावी.
औदुंबर गायकवाड, रोपळे .ता.पंढरपूर
जनहित शेतकरी संघटना