*अपहरण झालेल्या बालिकेचा 52 तासात लावला शोध* *करकंब पोलीसांची कामगिरी*

करकंब :प्रतिनिधी
करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या उंबरे या गावातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल उंबरे येथील नवनाथ हरिदास कानगुडे याचेवर गुन्हा दाखल झाला असून अपहरण झालेल्या बालिकेचा केवळ 52 तासात पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पंढरपूर चे पोलीस उप अधिक्षक विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापुर येथून शोध घेतले बद्दल करकंब पोलीसां चे कौतुक होत आहे.
घटनेची हकीकत अशी की उंबरे पागे येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असल्याची तक्रार करकंब पोलीस स्टेशन येथे 2 ऑगस्ट 2021 रोजी दाखल झाली होती. करकंब पोलीस स्टेशन च्या पोलीस हवालदार सिरमा गोडसे यांनी सायबर पोलीसांची मदत घेऊन संशयीत इसमाची माहिती मिळवली. संशयीत आरोपी हा अल्पवयीन मुलीस घेऊन कोल्हापुर येथे गेल्याचे समजल्या नंतर सपोनि प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कोल्हापुर येथे पाठविले. कोल्हापुर येथे शाहूपुरी पोलीसांचे मदतीने तपास केला असता आरोपी हा एका गल्लीमध्ये मुलीस घेऊन आल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी जाऊन पोलीस हवालदार सिरमा गोडसे रमेश जाधव व सायबर चे अन्वर आत्तार यांनी अरोपीस अटक करून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.अरोपीस अटक करून न्यायलयापुढे उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास सपोनि प्रशांत पाटील हे करीत आहेत.
अत्यंत जलद केलेल्या कारवाईचे व पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.