*विठ्ठलकडील शेतकऱ्यांची थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा* ... *राज्याच्या सहकार खात्याने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय * *शेतकऱ्यांचे बँक खाते नंबर लवकरच देण्यासाठी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना सूचना

*विठ्ठलकडील शेतकऱ्यांची थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा* ...  *राज्याच्या सहकार खात्याने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय *  *शेतकऱ्यांचे बँक खाते नंबर लवकरच देण्यासाठी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना सूचना

पंढरपूर/प्रतिनिधी

राज्याच्या सहकार खात्याने साखर आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांची बैठक घेऊन, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल कारखान्याकडे शिल्लक असलेली सुमारे १ लाख ९ हजार पोती साखरेची विक्री करून , यातून येणारी रक्कम शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस देण्यात यावी, असा तोडगा काढला आहे .महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या साखरेची निविदेनुसार विक्री करणार असून , त्यातून येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांच्या बिलाची रक्कम त्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या वृत्ताने शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सन २०२०- २१ मध्ये विठ्ठल कारखान्यांमध्ये गाळप झालेल्या उसाची एफआरपी रक्कम अद्यापही कारखान्याकडे येणे बाकी आहे .यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ही रक्कम ३७ कोटींच्या घरात आहे. विठ्ठलचे सभासद यासाठी वारंवार आंदोलने करत होते. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विठ्ठलच्या शिल्लक साखर पोत्यांवर अधिकार सांगितला होता. यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत ही साखर विक्री थांबवली होती. उच्च न्यायालयाने यासंदर्भात बँकेच्या बाजूने निर्णय दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंढरपूरच्या तहसीलदारांनी ही साखर सील केली होती, परंतु अद्याप विक्री केली नव्हती.


आता राज्य सरकारने मध्यस्थी करून साखर आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये तोडगा काढला आहे. साखर विक्रीतून येणारी दोन तृतीयांश रक्कम शेतकऱ्यांच्या बिलापोटी देण्यात यावी, तर एक तृतीयांश रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत जमा करावी, असा हा तोडगा बँकेनेही मान्य केला आहे. यानुसार आता कारवाई होणार असून , १ लाख ९ हजार साखर पोत्यांच्या विक्रीतून सुमारे, ३४ कोटी रुपये जमा होणार आहेत. या रकमेतून शेतकऱ्यांना सुमारे २२ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे १२ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.


विठ्ठल साखर कारखान्याकडील शिल्लक साखरेची लवकरच विक्री होणार आहे , आणि  शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट नंबरही उपलब्ध केले जाणार आहेत.