*शेवते येथील खडीक्रशर चालका विरोधात वीज चोरीला गुन्हा दाखल* -* तब्बल 11 लाख 54 हजार रुपयांच्या विजेची केली चोरी*

करकंब/प्रतिनिधी-
पंढरपूर तालुक्यातील शेवते येथील जिजाऊ स्टोन क्रशर या खडी क्रेशर वरील अद्योगिक वीज जोडणीची तपासणी महावितरण कंपनीच्या सोलापूर येथील फिरते पथकाने दि 17 जून 2022 रोजी तपासणी केली असता मीटर मध्ये फेरफार केल्याने वीज ग्राहक भारत वैजीनाथ कोरके याच्या विरोधात पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि 17 जून 2022 रोजी सोलापूर येथील वीज वितरण कंपनीच्या फिरते पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश चनबसप्पा जोगी,सहाय्यक अभियंता गणेश पिलाजी घोडे,सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी आरती अजित सुर्यवंशी,वरीष्ठ तंत्रज्ञ नितीन मारुती विभूते व गणेश बबन फसफुले हे शेवते येथील जिजाऊ स्टोन क्रशर येथील वीज ग्राहक भारत वैजीनाथ कोरके यांच्या औद्योगिक वीज जोडणीची तपासणी करण्यास गेले असता ग्राहक नंबर 337540001744 असलेला हा मीटर जिनस कंपनीचा असून त्याचा नंबर 5822698 असा होता.त्याचे मीटर रिडींग 64522KWH होते तर मिटरची क्षमता 40-200 अँम्पियर होती.
त्यानंतर मीटर बॉडीची तपासणी केली असता मिटरचे दोन्ही सील संशयास्पद आढळून आल्याने स्टोन क्रशर मधील वीज जोडणीची कसून तपासणी करण्यात आली.त्यामध्ये मीटर डिस्प्लेच्या वरील बाजूस असलेल्या ट्रान्सफरंन्ट कव्हरच्या खालील बाजूस दोन्ही बाजूला दोन नट बसवून ते फेव्हीकॉल ने बुजविण्याचा प्रयत्न केल्याचा आढळून आले.तसेच मीटर टर्मिनल ओपनची तारीख 4 डिसेंबर 2019 दिसत होती त्यामुळे मीटर पुढील तपासणी साठी ताब्यात घेऊन सोलापूर चाचणी विभागात पडताळणीसाठी नेण्यात आला होता.
सदर मीटरची सोलापूर चाचणी विभाग येथे चाचणी केली असता मीटरच्या सीटी सेकंडरी वायर्सना रिमोट सर्किट जोडल्याचे आढळून आले आहे.अशा प्रकारे मीटर मध्ये फेरफार करून वीज ग्राहक भारत कोरके हे वीज चोरी करीत होते.सदर ग्राहकाने मागील 31 महिन्यात (डिसेंबर 2019 ते जुन 2022) मध्ये एकूण 62567 KWH युनिट ची वीज चोरून वापरली असून याचे एकूण वीज बिल रक्कम 11 लाख 54 हजार 130 रु. व तडजोड रक्कम 5 लाख रु. अशी एकूण 16 लाख 54 हजार 130 रु.वीज वापराचे भरावे लागणार आहेत.वरील एकूण रक्कम भरलेली नाही म्हणून भारत वैजीनाथ कोरके याच्या विरोधात विद्युत कायदा 2003 चे कलम 135 च्या तरतुदी नुसार वीज चोरीचा गुन्हा माळशिरस पोलिसात दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.