*लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना शेवते - खेडभोसे रस्त्याच्या कामांचा पडला विसर*

खेडभोसे / प्रतिनिधी,
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पंढरपूर तालुक्यातील शेवते ते खेडभोसे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना चिखलातुन रस्ता शोधावा लागत आहे.
शेवते ते खेडभोसे हे पाच किलोमीटर अंतर आहे. या पाच किलोमीटर पैकी शेवते गावाकडून दोन किलोमीटर खडीकरण आहे. तर खेडभोसे गावाकडून दोन किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे.
आता खेडभोसे शीव ते पवार वस्ती ह्या एक किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. या एक किलोमीटर मध्ये साधे खडीकरण सुध्दा नाही. या रस्त्याने वाहनच काय पण माणसांना देखील व्यवस्थित चालता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातच सध्या या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने या रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकाना खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
निवडणूका आल्या कि या भागातील लोकप्रतिनिधी या रस्त्याने येतात मात्र एकदा निवडणूका झाल्या कि इकडे फिरकत सुध्दा नाहीत. शेवते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.
चौकट : 1) विधानसभा निवडणूकी दरम्यान खेडभोसे येथील पवार वस्तीवरील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता, याची कुणकुण लागताच आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी या ग्रामस्थांनी मध्यरात्री 11 वाजता भेट घेऊन या रस्त्यावर तत्काळ मुरुम टाकून देतो आणि निवडणुकीनंतर पक्का रस्ता मंजूर करून आणतो, असे आश्वासन देत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले होते.
मात्र ही घटना उलटून आता दोन वर्षे झाली आहेत. तरीसुद्धा रस्त्याची दुरवस्था कायम राहिली आहे.
त्यामुळे या भागातील लोकांमध्ये आमदार शिंदे यांनी फसविले असल्याची भावना निर्माण झाली आहे.
2) शेवते - खेडभोसे हा रस्ता मंजूरी प्रक्रियेत आहे तरीसुद्धा येत्या 15 दिवसात खडीकरणाचे काम सुरू करण्यात येईल.
दीपक कपिले,
शाखा अभियंता,
बांधकाम विभाग,
जिल्हा परिषद, सोलापूर