*कर्मवीर’ च्या प्राचार्यपदी प्रोफेसर डॉ. दादासाहेब साळुंखे बदलीने रुजू*
पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रोफेसर डॉ. दादासाहेब साळुंखे हे बदलीने
नुकतेच रुजू झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी गावचे ते सुपुत्र
असून याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्याशिवाय या
महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे सेवा केली आहे.
त्यामुळे महाविद्यालयाशी पूर्वपरीचीत असलेले प्राचार्य साळुंखे हे
महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुजू झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा
वर्षाव होत आहे.
यापूर्वीचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांची आर. आर. पाटील
महाविद्यालय, सावळज येथे बदली झाल्याने निर्माण झालेल्या जागेवर
प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांची नियुक्ती झाली आहे. प्रोफेसर डॉ.
दादासाहेब साळुंखे यांनी यापूर्वी डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर
व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर येथे प्राचार्य
म्हणून काम केले आहे. तर तत्कालीन सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे
परीक्षा नियंत्रक म्हणून कार्य केले आहे. प्राचार्य डॉ. साळुंखे यांनी
शैक्षणिक क्षेत्रात एकूण सदतीस वर्षे सेवा केली असून त्यांना शिक्षक,
संशोधक, संशोधन मार्गदर्शक, परीक्षा नियंत्रक व प्रशासक अशा विविध
पातळीवरचा अनुभव आहे. त्यांनी सन दोन हजार सातमध्ये शिवाजी विद्यापीठ
कोल्हापूर येथून नॅनो मटेरियल याविषयात पीएच. डी पदवी संपादन केली आहे.
त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची संशोधन
मार्गदर्शक म्हणून मान्यता असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात
विद्यार्थ्यांनी पीएच.डी पदवी संपादन केली आहे. तर दोन विद्यार्थ्यांचे
पीएच. डी संशोधन अंतिम टप्प्यात आहे. संशोधन क्षेत्रात त्यांचा
नावलौकिक असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिसर्च
जर्नल्समधून त्यांचे साठपेक्षा अधिक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांनी पस्तीस परिषदा व वीस कार्यशाळांमधून सहभाग नोंदविला आहे.
चाळीसहून अधिक अभ्यागत व्याख्याने दिली आहेत. त्याशिवाय कनिष्ठ व वरिष्ठ
महाविद्यालयातील विज्ञान वर्गासाठी त्यांनी तीन संदर्भ ग्रंथांचे लेखन
केले आहे.
प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी एकोणिसशे चौऱ्याऐंशी पासून रयत
शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, पंढरपूर व सोलापूर
येथील महाविद्यालयामध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांना रयत शिक्षण
संस्थेचा बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार व पंढरपूर येथील
सनराईज आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.