*लोकशाहीने दिले सरपंचपद*! *कारभारात मात्र लोकशाहीच नडली* *रोपळेच्या सरपंच महिलेने मांडली व्यथा*

पंढरपूर (प्रतिनिधी)
आरक्षण सोडतीतून अल्पमतातील गटास सरपंचपद मिळाले, आणि बहुमतातील गटाने ग्रामपंचायत कारभारच थांबवला. पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे घडलेल्या या प्रकाराबाबत येथील महिला सरपंच शशिकला चव्हाण यांनी आवाज उठविला आहे. ग्रामपंचायत कारभारात असहकार्य करणाऱ्या सदस्यांबाबत , गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय तोडगा काढतात , याकडे रोपळे ग्रामस्थांसह संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.
रोपळे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी, येथील महिला सरपंच शशिकला दिलीप चव्हाण यांच्या विरोधात असरकार पुकारले आहे. सहाजिकच गावातील विकास कामांना खो बसला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात राजकीय आकस आणि जातिवाद केला जात असल्याचा आरोप, सरपंच शशिकला चव्हाण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. याबाबत आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी संबंधितांना दिले आहे. या निवेदनातून त्यांनी रोपळे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळावर प्रकाश टाकला आहे.
रोपळे ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत झाली. या सोडतीमध्ये रोपळे गावचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले. यावेळी येथील तेरा सदस्य निवडून आणलेल्या परिचारक गटाकडे, या वर्गाचा विजयी सदस्य नव्हता. विरोधी काळे गटाकडे मात्र सरपंच पदासाठी विजयी पात्र उमेदवार होता. यामुळे सहाजिकच काळे गटाच्या शशिकला दिलीप चव्हाण यांना हे सरपंचपद मिळाले, आणि गावचा कारभार सुरू झाला .सरपंच शशिकला चव्हाण यांनी आजपर्यंतच्या कारभाराचा पाढाच वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे वाचला आहे.
रोपळे गावच्या सरपंचपदी शशिकला चव्हाण यांची नेमणूक २७ फेब्रुवारी रोजी झाली. आरक्षणातून सरपंच पद मिळाले असले तरी, पुरेसे बहुमत पाठीशी नसल्याने ग्रामपंचायत कारभार करणे मुश्कील होऊन बसले . प्रत्येक महिन्याच्या बैठकीत उपसरपंच आणि विरोधी गटाच्या सदस्यांनी आजतागायत कोणत्याही विकास कामास पाठिंबा दिला नाही. एवढ्यावरच न थांबता ग्रामसेवक जे. एच. नवले यांनाच अरेरावी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, त्यांनी दोन महिन्याची रजा घेतली, आणि तेव्हापासून आजतागायत रोपळे गावास ग्रामसेवकच मिळाला नाही. ग्रामसेवक खरात यांना तात्पुरता चार्ज देण्यात आला होता , परंतु त्यांना सहीचा अधिकार देण्यास उपसरपंच हनुमंत हरिदास कदम यांनी विरोध केल्याने, कारभार जागेवरच थांबल्याचे सरपंच चव्हाण यांनी सांगितले आहे.
रोपळे गावात सुरू असलेल्या या राजकीय आकसाने, विकासकामे थांबली आहेत. सामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत .नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत, आजपर्यंत एकाही विकासकामास मंजुरी मिळू शकली नाही, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगारही थकले असल्याचा खुलासा, सरपंच शशिकला चव्हाण यांनी केला आहे. रोपळे गावच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत कारभार सुरळीत होणे आवश्यक आहे. राजकीय आणि जातीय आकसातून सुरू असणाऱ्या या प्रकाराची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन , आपणास काम करण्याची संधी प्राप्त करून देण्याची मागणी महिला सरपंच, चव्हाण यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आले, यावेळी सरपंच शशिकला चव्हाण तसेच जनसेवा संघटनेचे अशोक पाटोळे उपस्थित होते.