उत्तम नियोजनामुळे स्वेरी अग्रेसर             – नितालचे माजी उपाध्यक्ष सुदर्शन नातू स्वेरीत ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २१’ ऑनलाइन स्पर्धा संपन्न

उत्तम नियोजनामुळे स्वेरी अग्रेसर             – नितालचे माजी उपाध्यक्ष सुदर्शन नातू   स्वेरीत ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २१’ ऑनलाइन स्पर्धा संपन्न

पंढरपूर/प्रतिनिंधी 


पंढरपूर: ‘आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता स्वेरीमधील शैक्षणिक पद्धतीचे व  ‘पंढरपूर पॅटर्न’ चे अनुकरण करण्यासारखे आहे. नियोजन असो अथवा ‘पंढरपूर पॅटर्न’ची शिक्षण पद्धती असो, याद्वारे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात दिवसेंदिवस भर पडून प्रगती साधली जात आहे. डॉ.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अभ्यासक्रमाचे नियोजन उत्तम पद्धतीने करून त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे स्वेरीच्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळत असते. या कारणांमुळे स्वेरीच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमांकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे स्वेरीतून मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.’ असे प्रतिपादन निताल कॉम्प्युटर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे माजी उपाध्यक्ष सुदर्शन नातू यांनी केले. 
          गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘इ स्क्वेअर -लॉजिक २ के २१’ या ऑनलाइन उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी निताल कॉम्प्युटर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड चे माजी उपाध्यक्ष सुदर्शन नातू मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्तविक समन्वयक प्रा. प्रगती ताठे यांनी करून कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा सांगितली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी पवार यांनी या कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख करून दिली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाच्या अल्पावधीत घेतलेल्या गरुडझेपेची माहिती दिली तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाची माहिती डॉ. व्ही.जी.काळे यांनी दिली. विशेष अतिथी अशोक सराफ म्हणाले की, ‘या स्पर्धांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन गुणांना व कल्पकतेला वाव देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण झाले असून सादरीकरणाच्या माध्यमातून नवीन प्रोजेक्ट, संकल्पना सादर करणे आवश्यक आहे. या स्पर्धात्मक कार्यक्रमामुळे संशोधनाला अधिक गती येणार आहे.’ या राज्यस्तरीय उपक्रमात पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, आयडिया प्रेझेंटेशन, टेक्नीकल क्वीज आणि सॉफ्टवेअर सिमुलेशन अशा प्रकाराच्या स्पर्धा झाल्या. सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘एका नवीन विचारातून दुसऱ्या नवीन विचाराची निर्मिती होत असते. यासाठी विद्यार्थ्यांनी तांत्रिक संशोधनाकडेही अधिक लक्ष द्यावे. अशा स्पर्धेतून भविष्यात अनेक विद्यार्थी संशोधक म्हणून निर्माण होतील.’ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट संबंधीची सविस्तर माहिती देताना प्रा.आशिष जाधव यांनी आत्तापर्यंत स्वेरीत आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कंपन्यांसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याविषयी माहिती दिली. या एक दिवसीय ऑनलाइन चाललेल्या तंत्रस्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दोन्ही विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. समन्वयक प्रा. एम.एस.येड्रामी यांनी आभार मानले.