*खून प्रकरणातील फरार आरोपीकडून धमकी* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे महेश साठे आक्रमक* *लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच निवडीवरून वाद सुरु*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलेल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या महेश साठे यांना धमकी देण्यात आली आहे. याच गावातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकीय नेते प्रमोद देठे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार, महेश साठे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश साठे यांनी स्वतःच्या घरातील ४ उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आणले आहेत. निवडणुकीदरम्यान आणि नंतरही भालके काळे गटाचे ७ सदस्य साठे यांच्या संपर्कात होते. निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी परिचारक गटाशी घरोबा करण्याचा प्रयत्न केला. परिचारक गटाशी सूत जुळले नाही. दरम्यान परिचारक गटाने महेश साठे यांच्याशी संपर्क साधला. चर्चा घडून परिचारक साठे युती अस्तित्वात आली. परिचारक गटाचा सरपंच आणि साठे गटाचा उपसरपंच करण्याचे ठरवण्यात आले. ठरल्याप्रमाणे १७ ऑगस्ट रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली. परिचारक गटाच्या विजयमाला सचिन वाळके तर उपसरपंचपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे संजय साठे यांची निवड झाली.
गेली अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर वर्चस्व गाजवणाऱ्या प्रमोद देठे यांना हे मान्य झाले नाही.
भालके गटाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमोद देठे यांच्यावर यापूर्वीच खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या ते फरार आहेत. सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी त्याच्या कानावर गेल्या. हातून सत्ता गेल्याने राग अनावर झाला. बुधवार दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास, महेश साठे यांना प्रमोद देठे याचा फोन आला.
फोनवरून त्याने एक खून केला आहे , दुसरा खून करण्यास वेळ लागणार नाही, असे म्हणत साठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात महेश साठे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फरार आरोपीने फोनवर खुलेआम धमकी देण्याचा प्रकार घडल्याने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चौकट
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील प्रमोद देठे या इसमाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे महेश साठे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आपणास आणि कुटुंबास या व्यक्तीकडून धोका असल्याची तक्रार, महेश साठे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.